नागपूर, 20 डिसेंबर
पिवळा गर्द फेटा, कपाळावर भंडारा, खांद्यावर घोंगडे व काठी हातात घेऊन उंच धिप्पाड अशा जयंत पाटलांनी येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत विधानसभा सभागृहात प्रवेश केला. आपल्या पक्षाचा चेहरा बहुजनवादी व मागास दुर्बल समाजाला न्याय देणारा असल्याचे दर्शविण्यासाठी हा संपूर्ण आटापिटा असल्याचे दिसले.
सभागृहात प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील याचे काही सदस्यांसह घोषण देत आगमन झाले. तेव्हा येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर राष्ट्रावादी काँग्रेस सदस्यांनी केला. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांना काठी बाहेर ठेवून या असे बजावले. तेव्हा अजित पावार यांनी जयंत पाटलांच्या पायाला दुखापत झाली असल्याचे सांगितले. तर, अध्यक्षांनी काही डॉक्टरचं प्रमाणपत्र आणलं आहे का? दुखापत वगैरे झाली नाही. ते एकदम कडक चालत आहे. असे उद्गार काढताच सभागृहात एकच हशा पिकला.
यावेळी अध्यक्षांनी जयंत पाटील यांना बोलण्याची संधी दिली. ही धनगर समाजाची काठी आहे असे बजावून पाटील यांनी काठी बाहेर पाठवून दिली. पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते. त्याचा या सरकारला विसर पडला आहे. सरकारला जागृत करण्यासाठी ही भूमिका घेवून आल्याचे त्यांनी स्पष्ट करीत, सरकारने धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास आज ही काठी केवळ मी हाती घेतली आहे. भविष्यात समाज हातात काठी घेतल्या शिवाय राहणार नाही असा इशारा दिला.