सरकारचा कर्जमाफीचा दावा खोटा आणि पारदर्शकता तकलादू- माजी मंत्री भास्कर जाधव यांची सरकारवर टिका...

 15 Dec 2017  394
 
नागपूर दि. १५ – मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी राणाभीमदेवी थाटात कर्जमाफी संदर्भात भाषण केले त्याला २४ तास उलटले नाहीत त्यापूर्वीच त्यांचा कर्जमाफीचा दावा किती फोल होता,किती फसवा होता,किती खोटारडा आणि त्याची पारदर्शकता किती तकलादू होती हे सत्ताधारी आमदारांच्या कर्जमाफीच्या यादीतील नावावरुन स्पष्ट झाले असल्याची टिका आमदार भास्कर जाधव यांनी केली.


सत्ताधारी पक्षातील शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे कर्जमाफीमध्ये नाव आले आहे. हे त्यांनीच जाहीर केले असल्यामुळे ही पारदर्शकता किती फसवी आहे. कर्जमाफी किती फसवी आहे हे स्पष्ट झाले आहे. या कर्जमाफीचा कुणाकुणाला लाभ मिळणार हेही स्पष्ट झाले आहे असेही भास्कर जाधव म्हणाले.


भास्कर जाधव यांनी सभागृहामध्ये हा मुद्दा लावून धरलाच शिवाय त्यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर निवेदन करताना त्यांनी सांगितले होते की, गेल्या राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस सरकारच्या सरकारमध्ये जी ७३ हजार कोटीची कर्जमाफी झाली होती. त्यामध्ये या सदनातील एका आमदाराने कर्जमाफीचा लाभ घेतला होता असे सांगून सभागृहातील २८८ आमदारांबद्दल त्यांनी संशय निर्माण केला. आमचा आग्रह होता की, तुम्ही त्यांचे नाव सांगा परंतु त्यांनी त्यांचे नाव सांगण्याचे धाडस दाखवले नाही. त्यावेळी कर्जमाफीमध्ये कसा घोळ झाला, कशापध्दतीने लुटालुट झाली, काही मंडळींनी उखळ पांढरं करुन घेतलं असं सांगून आम्ही यावेळची कर्जमाफी कशी पारदर्शक पध्दतीने करतो आहोत असा सांगण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. परंतु ते सोयीस्करपणे ही गोष्ट विसरले की, गेल्यावेळेला जी कर्जमाफीची अट होती, त्यातली महत्वाची अट होती की, अल्पभूधारक म्हणजे ज्यांची पाच एकरपेक्षा जमीन कमी आहे त्या सर्वांना सरसकट कर्जमाफी मिळेल. अशाप्रकारचा सरकारचा निर्णय होता आणि त्यामुळे त्या कर्जमाफीचा सगळ्या स्तरातील लोकांना लाभ झाला. त्यामुळे त्याच्यापैकी ते आमदार असू शकतील. पण हे सांग असताना यावेळेला त्यांनी आम्ही आमदारांना, खासदारांना, जिल्हापरिषदेच्या सदस्यांना कर्जमाफी देणार नाही, इन्कमटॅक्स पेडरना कर्जमाफीचा लाभ देणार नाही, सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळू देणार नाही. अशी पारदर्शकतेने आम्ही कर्जमाफी करु असे त्यांनी सांगितले होते.परंतु २४ तासातच त्याची पोलखोल झाली आहे असेही भास्कर जाधव म्हणाले.