* सरकारच्या तृतीय वर्षपूर्तीनिमित्त विशेष मुलाखत
अनिता शुक्ला
मुंबई, 30 ऑक्टोबर
दळवळण, शौचालय, निवास, उद्योग, शिक्षण, रोजगार, ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रात आमच्या सरकारने उल्लेखनिय कामगिरी केली आहे. तीन वर्षात सगळं बदललं असा आमचा दावा नाही. मात्र, प्रगतिची दिशा राज्याला दाखविण्याचे काम आम्ही केले आहे. अशाचपध्दतीने राज्याचा विकास दर 10 टक्क्याने वाढत राहला. तर, 2030 मध्ये महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल आणि आमचा तोच प्रयत्न असेल, असा आशावाद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्यातील भाजपा सरकारला आज 31 ऑक्टोबरला तीन वर्षे पूर्ण झालीत. सरकारच्या तृतीय वर्षपूर्तीच्या निमित्त्याने विशेष मुलाखतीप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, राज्याचा विकासदर 9.45 टक्के होता, तो आता वाढून 10 टक्क्यांवर पोहोचला आहे. उद्योगाचा विकास दर मागील वर्षीच्यातुलनेत आता चांगला आहे. नोटबंदी किंवा जीएसटीचा परिणाम झालेला नाही. महाराष्ट्राची अत्यंत वेगाने विकासाच्यादिशेने वाटचाल सुरु आहे.
* बँकांचा गोरखधंदा उघड
पहिल्यांदा बँकांना माहिती मागितली तेव्हा बँकांनी 89 लाख शेतकर्यांची यादी सरकारला दिली. त्यानंतर सरकारने आपला 66 कॉलमचा एक नमूना भरून द्यायला दिला तेव्हा लक्षात आले की, बँकांनी बर्याच शेतकर्यांचे सारखेच आधार नंबर, डमी नाव आढळले. तेव्हा साडेतेरा लाख खाते कमी झाले. सरकारने घेतलेल्या ऑनलाईनच्या निर्णयामुळे बँकांचा चाललेला गोरखधंदा उघड झाला आणि त्यावर अंकुश देखील लागला. आता खर्या शेतकर्यांनाच लाभ मिळेल. असे मुख्यमंत्री म्हणाले.
* सेनेला कानपिचक्या
भाजपा-सेना दोन्ही वेगवेगळे पक्ष असल्याने दोघांचे विचार हे वेगवेगळे असणे स्वाभाविक आहे. मात्र, प्रत्येकवेळी प्रत्येक विषयावर वेगळी भूमिका घेणे, विरोध करणे चुकीचे आहे. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सेनेचे कान उपटले. सरकार म्हणून विचार केला तर, एकाचवेळी सत्ताधारी आणि विरोध अशा दोन्ही भूमिका घेता येत नाही. याचा त्यांना फायदा आणि आम्हाला नुकसान होणार नाही. याचा तोटा सरकारला होतो. असेही ते म्हणाले.